भररस्त्यात वाट अडवित दुचाकीस्वाराने केला कॉलेज तरूणीचा विनयभंग
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हौसन रोड भागात भररस्त्यात वाट अडवित दुचाकीस्वाराने कॉलेज तरूणीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन पीडिता देवळाली कॅम्प महाविद्यालयात शिक्षण घेत असून मंगळवारी दुपारी ती कॉलेज सुटल्याने घरी पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीस्वार संशयिताने तिची वाट अडवित छेड काढीत मुलीस नाव गाव विचारले. मात्र मुलीने नकार देत आपल्या मैत्रीणींकडे आपबिती कथन केल्याने ही घटना घडली. मैत्रीणीने संशयितास जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने पीडितेस तुझ्याकडे बघतो अशी धमकी देत तिचा विनयभंग केला. सोपान विठ्ठल पाळदे (२४ रा.शिंगवे बहुला,दे.कॅम्प) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण (पोक्सो) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक तेजल पवार करीत आहेत.
……
३० वर्षीय युवकाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडको परिसरातील शाहूनगर भागात राहणा-या ३० वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. सागर किसन पाटील (रा.शनिमंदिराजवळ,शाहूनगर) असे आत्महत्या करणा-या युवकाचे नाव आहे. सागरच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पाटील याने बुधवारी (दि.७) दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात पंख्याच्या कडीस साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.