नाशिक : कॉलेजरोडवरील बर्गर किंग या दुकानासमोर कुठलेही कारण नसतांना टोळक्यांनी वाहन अडवित कार चालकास बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणी दिलीप राजाराम नलावडे (५९ रा.अंबड लिंकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या मारहाणीत हॉकीस्टीकचा वापर करण्यात आल्याने चालक जखमी झाला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चारचाकीतून आलेल्या त्रिकुटाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नलावडे मंगळवारी (दि.६) रात्री कॉलेजरोड भागात गेले होते. कारमधून ते आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. बर्गर किंग या दुकानासमोरून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून एमएच १५ एचजी ३७९० या चारचाकीतून ओव्हरटेक करी आलेल्या चारचाकीतून आलेल्या त्रिकुटाने नलावडे यांची वाट अडविली. यावेळी सदर वाहनातील चालकाने नलावडे यांना शिवीगाळ करीत वाहनातून खाली खेचत हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. यावेळी त्याच्या दोन साथीदारांनीही कुठलेही कारण नसतांना नलावडे यांना मारहाण केली असून या घटनेत ते जखमी झाले आहेत. अधिक तपास हवालदार खुळात करीत आहेत.