नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भरदिवसा उघड्या घरात शिरून चोरट्यांनी सोन्याचांदीच्या दागिण्यांसह रोकड असा सुमारे दोन लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना दिंडोरीरोड आणि महात्मानगर भागात घडली. या घरफोडी प्रकरणी अश्विनी जितेंद्र मोरे (रा. महालक्ष्मी अपा.साईनगर) यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी म्हसरूळ व गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दिंडोरीरोड भागातील मोरे यांच्या जाऊबाई रेणूका मोरे या मंगळवारी घरात एकट्या असतांना ही घटना घडली. रेणूका मोरे या नेहमी प्रमाणे दुध घेण्यासाठी घराबाहेर पडल्या असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात शिरून बेडरूममधील कपाटात कपड्यांमध्ये ठेवलेले सुमारे ९३ हजार रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले. सोसायटी खालून दूध घेवून त्या घरी परतल्या असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत. दुसरी घटना महात्मानगर येथे घडली. प्रदिप विष्णू पाटील (रा.परिश्रम अपा.महात्मानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील गेल्या गुरूवारी (दि.२५) रात्री आपल्या घरात असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या उघड्या दरवाजातून प्रवेश करीत कपाटातील ५० हजाराची रोकड आणि सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९५ हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक मोरे करीत आहेत.