नाशिक : पंचवटीतील मोबाईल शॉपी फोडणारा चोरटा मुंबईत पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्याकडून कारसह मोबाईल असा सुमारे साडे चार लाखाचा मुद्देमाल हस्तगत पोलिसांनी केला आहे. जावेदअली तकी खान (३५ रा.गहेबीनगर भिवंडी) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. संशयिताचे चार साथीदार अद्याप फरार आहे. त्याचा शोधही पोलिस घेत आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली.
पंचवटी कारंजा येथील मिथील लॉज खाली असलेली मुक्ता मोबाईल शॉपी हे दुकान गेल्या आठवड्यात चोरट्यांनी फोडले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पंचवटीसह शहर गुन्हे शाखा कामाला लागली होती. घटनास्थळी मिळालेल्या सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिस यंत्रणा चोरट्यांचा माग काढत असतांना युनिट १ ला खब-याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. चोरटे भिवंडी येथील असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस पथक रवाना झाले होते. संशयिताच्या घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले असता त्याने चार साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. संशयिताच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली कार आणि चोरलेले ४१ पैकी ३८ मोबाईल फोन असा सुमारे ४ लाख २२ हजार २६९ रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयिताच्या साथीदारांचा शोध सुरू असून तपासकामी त्यास मुद्देमालासह पंचवटी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार रविंद्र बागुल,प्रदिप म्हसदे,प्रविण वाघमारे,आसिफ तांबोळी,नाझिमखान पठाण,प्रशांत मरकड,महेश साळुंके,शरद सोनवणे,सुरेश माळोदे आदींच्या पथकाने केली.