नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- द्वारका परिसरात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून दोघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत लोखंडी रॉडचा वापर करण्यात आल्याने तरूण जखमी झाला आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नईम शेख आणि सयदाद खान अशी तरूणास मारहाण करणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उबेद शब्दार शेख (२८ रा.अजमेरी चौक, नाईकवाडीपुरा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. संशयित आणि तक्रारदार यांच्यात आर्थिक देवाण घेवाणीच्या कारणातून वाद आहे. उबेद शेख सोमवारी (दि.१) रात्री द्वारका भागात गेला असता दोघा संशयितांनी त्यास गाठून या वादातून शिवीगाळ करीत त्यास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत उबेद जखमी झाला असून त्याच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.
एमजीरोडवर वीज कर्मचा-याला मारहाण
महात्मा गांधी रोड भागातील खंडीत विजपुरवठा सुरळीत करीत असतांना एकाने धक्काबुक्की करीत कर्मचा-याला मारहाण केल्याची घटना घडली. धनंजय खैरनार असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी वीज कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ परशुराम पाडवी यांनी तक्रार दाखल केली असून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्दळीच्या महात्मा गांधी रोड भागातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने वरिष्ठ तंत्रज्ञ पाडवी व त्यांचे सहकारी अनारकली शॉप नजीक दुरूस्तीचे काम करीत असतांना ही घटना घडली. संशयिताने वीज कर्मचा-यांच्या कामात अडथळा आणला. यावेळी संतप्त संशयिताने शिवीगाळ व अंगावर धावून जात पाडवी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सुरवाडे करीत आहेत.