नाशिक : वेगवेगळया ठिकाणी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याच्या दोन घटना नाशिकरोड भागात शुक्रवारी घडल्या. याप्रकरणी उपनगर पोलिस आणि नाशिकरोड ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पहिली घटना पिंपळगाव खांब येथे घडली. विनायक शांताराम शिंदे (४७ रा.प्रा.शाळेजवळ,पिंपळगाव खां.) यांनी शुक्रवारी रात्री अज्ञात कारणातून गावातील महादेव मंदिरात लोखंडी गेटला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच मुलगा वैभव शिंदे यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत. दुसरी घटना नोटप्रेसच्या वेल्फेअर हॉल जवळील जंगलात घडली. गोरेवाडीतील संजय लक्ष्मण शिंदे (५२ रा.गायकवाड मळा,गोरेवाडी) यांनी शुक्रवारी सायंकाळी अज्ञात कारणातून परिसरातील बाभळीच्या झाडाला दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत चंद्रकांत शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक घेगडमल करीत आहेत.