नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालकाने मालकाची कार पळवून नेल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातग्रस्त नातेवाईकांना भेटण्यासाठी अहमदनगर येथे जात असल्याचा बहाणा करून ही कार चालक घेऊन गेला. पण, महिना उलटूनही चालक वाहनासह न परतल्याने मालकाने पोलिस स्थानकात तक्रार दिली. गणेश उर्फ बंडू उर्फ अमोल पोटे (रा.महाडीकवाडी ता.पेण जि.रायगड) असे संशयित चालकाचे नाव आहे. याप्रकरणी दीपक बापूराव सोनवणे (रा.नरहरीनगर,दसक जेलरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. सोनवणे यांच्या टूर अॅण्ड ट्रव्हल्सचा व्यवसाय असून संशयित त्यांच्याकडे चालक या पदावर काम करतो. गेल्या १८ जानेवारी रोजी संशयिताने भाऊ आणि पत्नीचा अहमदनगर येथे अपघात झाल्याची बतावणी करून सोनवणे यांची सुमारे साडे चार लाख रूपये किमतीची सेलेरिआयो कार एमएच ०४ जेव्ही ५२१७ अहमदनगर येथे घेवून गेला तो अद्याप परतला नाही. महिना उलटूनही संशयिताचा संपर्क होत नसल्याने सोनवणे यांनी पोलिसात धाव घेतली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पाटील करीत आहेत.