नाशिक – भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात मद्याच्या नशेत असलेला चालक ठार झाला. हा अपघात त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल भागात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवीसिंह अमरबहाद्दूर सिंह (१८) असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, सुनिल मुरलीधर पवार (रा. रा.श्रमिकनगर,सातपूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. सिंह रविवारी (दि.१२) रोजी सायंकाळच्या सुमारास मद्याच्या नशेत आपल्या दुचाकीने एमएच १९ सीएम ४२२१ त्र्यंबकरोडने प्रवास करीत असताना हा अपघात झाला.
सातपूर बस थांबा येथे अॅटोरिक्षाची प्रतिक्षा करीत असलेले सुनिल पवार यांना सिंह याने लिफ्ट दिली. पवार यांना दुचाकीवर डबलसिट घेवून जात असतांना सिंह याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मायको सर्कल परिसरात भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात सिंह जागीच ठार झाला तर पवार यांच्या दोन्ही पायांचे हाड मोडले असून,त्यांच्यावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवार यांच्या जबाबावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक रफिक शेख करीत आहेत.