नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्वच 15 तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावरून तिरंगा यात्रा, तिरंगा सायकल/ कार/ दुचाकी रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्टस, तिरंगा कॅनव्हॉस साईन, तिरंगा प्रतिज्ञा, शहीदांना श्रद्धांजली व तिरंगा मेळा असे विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे.
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 15 तालुक्यात एकूण एक हजार 388 ग्रामपंचायतींमध्ये आयोजित केलेल्या तिरंगा यात्रेत 78 हजार 4 नागरिक सहभागी झाले. तिरंगा सायकल/ कार/ दुचाकी रॅली उपक्रमात 62 हजार 118 जणांनी सहभाग नोंदविला तर तिरंगा रन/ मॅरेथॉन मध्ये 45 हजार 397 नागरिकांनी उस्फूर्तपणे भाग घेतला. तिरंगा कॉन्सर्टस उपक्रमात 1 लाख 50 हजार 688 स्पर्धकांनी सहभाग घेतला. तसेच तिरंगा कॅनव्हॉस साईनच्या 1 हजार 340 कार्यक्रमातून 59 हजार 480 नागरिकांनी देशाप्रती आपल्या भावना अधोरेखित केल्या. तिरंगा प्रतिज्ञा 1 हजार 459 कार्यक्रमात 74 हजार 173 नागरिकांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली तर 91 हजार 632 नागरिकांनी स्वातंत्र्य संग्रामात शहीद झालेल्या वीरांना 1 हजार 425 सामूहिक कार्यक्रमातून श्रद्धांजली वाहिली. जिल्ह्यात आयोजित केलेल्या 1 हजार 425 तिरंगा मेळ्यात 72 हजार 983 जणांनी सहभाग नोंदविला आहे.
जिल्ह्यातील 5 लाख 52 हजार 881 घरांपैकी 4 लाख 56 हजार 658 घरांवर तिरंगा फडकविला आला असून 28 हजार 546 नागरिकांचे तिरंगा सेल्फी हर घर तिरंगा संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत.