नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माझे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. सर्व कार्यकर्त्यांनी अतिशय मनाने आणि तळमळीने काम केले. माझ्या डोळ्यादेखत ते अहोरात्र मेहनत घेत होते. मात्र जो निकाल आला आहे तो मी स्वीकारत ,पुन्हा जोमाने लढण्याचा निश्चय मी केला आहे, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांनी दिली आहे.
भुजबळ पुढे म्हणाले की, नांदगाव मतदारसंघांमध्ये अतिशय भीती आणि दडपशाहीचे वातावरण होते. मात्र आम्ही ते भयमुक्त केले. म्हणून जनतेने भरभरून मतदान केले. हे आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाचे यश आहे. सर्व यंत्रणा आमच्या विरोधात होती. अनेकवेळा हल्ले करण्यात आले साम दाम दंड भेद वापरला गेला, ही लढाई खूप मोठी होती, पण आम्ही ती लढलो आणि पूर्ण शक्तीनीशी लढलो. मी पुन्हा एकदा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी ते म्हणाले की, पराभव झाला असला तरी देखील नांदगांव विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही कायमच प्रयत्नशील राहणार आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न कसे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतच राहू असे समीर भुजबळ यांनी म्हटले आहे.