मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड पासून जवळच असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीची निवडणूक रविवारी होत आहे. इंधन कंपन्यांच्या मालमत्ता करापोटी वार्षिक कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न या ग्रामपंचायतीला मिळते. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मोजक्या श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी एक नागापूर ही ग्रामपंचायत आहे. मात्र, येथील ही निवडणूक सध्या राज्यभरातच चर्चेची ठरली आहे.
नागापूर ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासह सर्व सदस्यांसाठी रविवारी मतदान होत आहे. आज प्रचार तोफा थंडावणार आहेत. मात्र, येथील प्रचार सध्या विशेष चर्चेचा ठरला. कारण, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार हे स्वतः सरपंचपदाच्या निवडणुकीत आहेत. तक, त्यांच्या पॅनल विरोधात त्यांचेच बंधू माजी आमदार संजय पवार यांचे पॅनल उभे ठाकले आहे. या ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्यासाठी तिरंगी लढत होत आहे. दोन्ही पवार बंधूंव्यतिरीक्त तिसरे पॅनलही शड्डू ठोकून आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ कोणाच्या पारड्यात आपली मते टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भावानेच भावाला आव्हान दिल्याने या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रचारही चांगलाच रंगला. आता मतदार काय निर्णय घेतात, त्यावर कोण विजयी होतो, याची चर्चा संपूर्ण तालुक्यातच रंगत आहे.