नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना निर्बंध आहे तसेच राहणार की त्यात आणखी वाढ होणार याचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. खासकरुन नाशिक शहरात रुग्ण वाढीचे प्रमाण लक्षणीय आहे. यापार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी चार वाजता कोरोना आढावा बैठक होत आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक शहरासह जिल्ह्यातील एकाच दिवसामधील बाधितांची संख्या ५००च्या आसपास होती. मात्र, आता ही संख्या जवळपास २ हजाराच्या जवळ आली आहे. खासकरुन नाशिक शहरात कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण मोठे आहे. गुरुवारी दिवसभरात तब्बल १३६८ नवे बाधित आढळून आले. त्यामुळेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ७ हजार ८६४ एवढी झाली आहे. हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने निर्बंध यापूर्वीच कडक केले आहेत. त्याचीच अंमलबजावणी सध्या केली जात आहे. निर्बंध लागू करुनही बाधितांचा आकडा वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
बाजारातील गर्दी
नाशिकसह जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. मास्कही वापरला जात नाही. याबाबत गेल्या कोरोना आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली होती. नियम पाळा अन्यथा समिती बंद ठेवण्याचे आदेश द्यावे लागतील, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला होता. मात्र, आता त्याबाबत काय निर्णय होणार याकडेही सगळ्यांचे लक्ष लागले आहे.