मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रेल्वेने मुंबईहून मनमाडमार्गे औरंगाबाद गाठण्यासाठी आता अर्ध्या तासाचा वेळ वाचणार आहे. कारण, मनमाडजवळील अंकाई ते औरंगाबाज रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. तसेच, या मार्गावरील रेल्वेच्या चाचण्या आजपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे ही बाब अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नव्याने विद्युतीकृत अंकाई ते औरंगाबाद रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या चाचण्या शुक्रवारपासून सुरू होणार असल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. चाचण्या पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात पहिली ट्रेन इलेक्ट्रिक ट्रॅक्शनने धावेल, असे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
डिझेल इंजिन बदलून इलेक्ट्रिक इंजिन लावण्याची गरज नाहीशी होईल. त्यामुळे मुंबई ते औरंगाबाद दरम्यानचा प्रवासाचा वेळ २५ ते ३० मिनिटांनी कमी होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मनमाडजवळील अंकाई ते औरंगाबाद दरम्यान विद्युतीकरण करण्यात आलेला मार्ग १०० किलोमीटर लांबीचा आहे. अंकाई-मुखेड (नांदेड) विद्युतीकरण प्रकल्पाचा हा भाग आहे. इलेक्ट्रिक इंजिन (लोकोमोटिव्ह) असलेल्या ट्रेनची चाचणी ३० डिसेंबरपासून सुरू होईल,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “विविध पॅरामीटर्सवरील चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, आम्ही पुढील महिन्यापर्यंत लोकोमोटिव्हद्वारे ओढलेली पहिली ट्रेन नियमित सेवेसाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Mumbai Aurangabad Via Train Distance Reduced by Half an Hour