मुंबई – येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. झिम्बाब्वेच्या दोन प्रवाशांकडून तब्बल 35 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही प्रवाशांना तसेच त्यांच्या संपर्कातील स्थानिक व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.
हवाई गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, झिम्बाब्वेच्या प्रवाशांनी हरारे ते अदिस अबाबा आणि अदिस अबाबा ते मुंबई असा (फ्लाइट क्रमांक ET 610) प्रवास केला. त्यांच्या चेक-इन केलेल्या बॅगच्या एक्स-रे स्क्रीनिंगमध्ये त्यातील सामग्रीच्या संशयास्पद प्रतिमा उघड झाल्या. चार चेक-इन केलेल्या बॅगची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. त्यामुळे बॅगच्या अस्तराखाली छुप्या कप्प्यात दडवून ठेवलेले पांढऱ्या रंगाची पावडर असलेले प्लास्टिकचे पाऊच मिळाले. चाचणी विश्लेषणाद्वारे हे सिद्ध झाले की पावडरसदृश्य पदार्थ हा “हेरॉइन” आहे. चार बॅगच्या झडतीमुळे बॅगमध्ये लपवून ठेवलेले (अंदाजे) 35.386 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले. स्थानिक बेकायदेशीर बाजारपेठेतील तस्करीचे मूल्य 240 कोटी रुपये (अंदाजे) आहे.
#IndianCustomsAtWork https://t.co/pbZ1JwQsxT
— CBIC (@cbic_india) December 10, 2021
दोन्ही प्रवाशांना नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायद्यान्वये अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तींच्या चौकशीत अटक केलेल्या दोघांच्या स्थानिक संपर्कातील व्यक्तीची ओळख उघड झाली. स्थानिक संपर्कातील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. त्याला शोधून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.