नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नॅक मानांकित ‘अ’ श्रेणी असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेतील सात शिक्षणक्रमांच्या नवीन अभ्यासकेंद्र स्थापनेचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विहित शुल्कासह स्विकारले जात आहेत. त्यासाठीची यावर्षीची शेवटची मुदत ही आगामी दिनांक १६ जून २०२५ ही आहे. त्यासाठी इच्छुक असणाऱ्या संस्था / महाविद्यालय / ट्रस्ट /विद्यालय / शाळा / स्वयं सेवी संस्था / संघ यांच्याकडे मानवी व भौतिक सुविधा असणे आवश्यक राहील. याबाबतची सविस्तर माहिती व नियमावली विद्यापीठाच्या https://ycmou.digitaluniversity.ac/ किंवा https://www.ycmou.ac.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छुकांनी नवीन अभ्यासकेंद्रासाठी विहित मुदतीच्या आत लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करावा असे आवाहन विद्यापीठ प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे.
विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या मान्यतेनुसार विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या १) एम. ए. शिक्षणशास्त्र (M83), २) विशेष बी. एड. शिक्षणक्रम (P-21) बौद्धिक अक्षमता, ३) शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम (P-10), ४) बालसंगोपन आणि रंजन शिक्षण (C-31), ५) स्वयं सहाय्यता समूह मुलभूत प्रमाणपत्र शिक्षणक्रम (C-105), ६) मूल्यशिक्षण (E-32) व ७) घरकाम कौशल्य विकास प्रमाणपत्र शिक्षणक्रम (E-36) या सात शिक्षणक्रमांच्या नवीन अभ्यासकेंद्र स्थापनेचे प्रस्ताव मागविण्यात आलेले आहेत. विद्यापीठाने वेळोवेळी निर्धारित केल्यानुसार अभ्यासकेंद्र प्रस्ताव प्रक्रियेमध्ये बदल होवू शकतात, त्यासाठी संबंधितांनी विद्यापीठ संकेतस्थळाचे अवलोकन करणे गरजेचे आहे. प्रत्येक शिक्षणक्रमासाठी प्रस्तावित अभ्यासकेंद्र हे नोंदणीकृत, ग्रंथालययुक्त, त्या – त्या शिक्षणक्रमातील तज्ज्ञ व्यक्तींची उपलब्धता व गरजेनुरुप शैक्षणिक आणि भौतिक साधनयुक्त असणे आवश्यक आहे.बीएड विशेष शिक्षण बौद्धिक अक्षमता या शिक्षणक्रमासाठी त्या शिक्षण शास्त्र महाविद्यालयात आरसीआय मान्यताप्राप्त आणि संबंधित पारंपरिक विद्यापीठाच्या बीएड बौद्धिक अक्षमता मान्यता असणे अनिवार्य आहे.
जुने बंद पडलेले अभ्यासकेंद्रे देखील नवीन मान्यतेसाठी अर्ज करू शकतात. तसेच एम. ए. शिक्षणशास्त्र व शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रमाच्या आधीच्या कार्यरत अभ्यासकेंद्रांनी पुनर्मान्यतेसाठी सशुल्क अर्ज भरणे अनिवार्य आहे, याची दाखल घ्यावी. अधिक माहितीसाठी शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या ०२५३ – २२३१४७२ या क्रमांकावर सुटीचे दिवस वगळता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव श्री. दिलीप भरड व शिक्षणशास्त्र विद्याशाखा संचालिका डॉ. संजीवनी महाले यांनी केले आहे.