मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अती श्रीमंत व्यक्ती काय खरेदी करते? याची उत्सुकता सर्वांनाच असते, इतकेच नव्हे तर त्याची चर्चा देखील होत असते. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी नवीन कार खरेदी केली आहे. या कारची किंमत तब्बल 13 कोटी 14 लाख आहे. ही हॅचबॅक कार यूकेच्या लक्झरी वाहन उत्पादक कंपनी रोल्स रॉयसने बनवली आहे. या कारची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. एका आरटीओ अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, ही भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे. या गाडीची नोंदणी दक्षिण मुंबईतील ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयात 31 जानेवारीला झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
2018 मध्ये ही कार लॉन्च झाली तेव्हा तिची मूळ किंमत 6 कोटी 95 लाख होती. ऑटो इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मते, या कारमध्ये बदल करण्यात आला. त्यानंतर तिची किंमत वाढली. ग्राहकांच्या मागणीनुसार, कारमध्ये अतिरिक्त सुविधा दिल्या जातात. त्यामुळे कारची किंमत देखील वाढते. तसेच आरटीओ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने एकरकमी कर म्हणून 20 लाख रुपये जमा केले आहेत. या कारची नोंदणी 30 जानेवारी 2037 पर्यंत वैध आहे. 40 हजार रुपयांचा रस्ता सुरक्षा करही कंपनीने जमा केला आहे. ही कार भारतातील आतापर्यंतची सर्वात महागडी कार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या म्हणजे मुकेश अंबानी यांच्या कारच्या VIP क्रमांकासाठी अतिरिक्त तब्बल 12 लाख रुपये जमा मोजले आहेत.
विशेष म्हणजे ही कार जगातील सर्वात मोठी आणि सर्वात वेगळी दिसणारी लक्झरी एसयुव्ही आहे. या कारमध्ये 6200 cc चे पेट्रोल इंजिन असून मायलेज 14 kmpl आहे. टस्कन कलरची ही लक्झरी कार 12 सिलेंडरची असून कारचे वजन 2.5 टन आहे. एका रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांच्याकडे 170 हून अधिक कारचे कलेक्शन आहे. ज्यामध्ये रोल्स रॉयस, बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसह अनेक गाड्यांचा समावेश आहे. मुकेश अंबानींकडेही ‘मर्सिडीज मेबॅक 62’ ही कार आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता यांनी मुकेश अंबानी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही कार भेट दिली होती.