नाशिक: (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आस्थापनेवर जाहिरात क्र. 09/2022 अन्वये शिक्षकेतर पदांकरीता परीक्षा घेण्यात आली आहे. विद्यापीठाच्या भरती प्रक्रिया परीक्षेबाबत प्राप्त हरकतींच्या अनुषंगाने चौकशी समिती नेमण्यात आली होती. सदर चौकशी समितीकडून पुढील निरिक्षणे प्राप्त झाली असल्याचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले आहे.
विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेत कुठल्याही परिक्षार्थी उमेदवाराने परीक्षा कालावधी दरम्यान डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे किंवा परीक्षेत गैरप्रकाराकरीता कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरणे बापरल्याबाबतची तक्रार केल्याचे आढळून येत नाही.
विद्यापीठास आरोग्य विज्ञानाच्या विविध अभ्यासक्रमांची परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव असून परीक्षा केंद्रांवर केंद्रप्रमुख, केंद्र निरीक्षक, अंतर्गत दक्षता पथक व भरारी पथक अशी यंत्रणा नेमण्यात आली होती. त्यामुळे तक्रारीत नमुद घटना घडणार नाही याची विद्यापीठाने योग्य ती खबरदारी घेतली होती. डमी अथवा बोगस उमेदवार परीक्षेस बसणे, परीक्षेमध्ये गैरप्रकार करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होणे याबाबतच्या तक्रारी या टप्प्यावर ठोस पुराव्यांअभावी सिध्द होत नाहीत.
निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करतांना सदर नियुक्ती आदेश त्यांच्या विरुध्द कुठल्याही पोलीस ठाण्यामध्ये फौजदारी स्वरुपाचा व विशेषतः कुठल्याही परीक्षेत गैरकृत्य केल्याबाबतचा गुन्हा नोंद नसल्याचे किंवा प्रलंबित नसल्याचे हमीपत्र देण्याच्या अधीन राहुन नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात यावा. सदर हमी पत्रातील माहिती कुठल्याही स्तरावर खोटी असल्याचे आढळुन आल्यास संबंधीत उमेदवाराची नियुक्ती रद्द करुन सेवा खंडीत करण्याचा विद्यापीठास अधिकार असेल याबाबततची अट नियुक्ती पत्रात नमुद करण्यात यावी. तसेच, नियुक्ती आदेशानुसार संबंधीत पदावर रुजु होतांना पोलीस यंत्रणेमार्फत दिला जाणारा चारित्र पडताळणीचा दाखला घेण्यात यावा असेही चौकशी समितीने म्हटले आहे.
MUHS Recruitment Process Enquiry Committee Report
Health University Medical Education