अमरावती (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहे… हे ऐकल्यावर तुम्ही पुन्हा बुचकाळ्यात पडाल. कारण एका रात्रीतून मुख्यमंत्री बदललेले आपण बघितले आहेत. अश्यात देवेंद्र यांचं नाव पुन्हा एकदा ऐकल्यावर आश्चर्य वाटणारच. पण तसं काहीही नाही. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच’ ही घोषणा नसून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं विधान आहे.
सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेतील जागांसाठी निवडणुकांचं वारं वाहात आहे. सगळीकडे जोरदार प्रचार सुरू आहे. शिंदे-फडणवीस गटात उमेदवार निश्चितीवरून अंतर्गत धुसफुस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांनी जाहीर सभेत देवेंद्रच मुख्यमंत्री असल्याचं विधान करून आणखी एका राजकीय चर्चेला तोंड फोडले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती येथे प्रचार सभेला उपस्थित होते. पश्चिम विदर्भाची उमेदवारी माजी गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांना देण्यात आली आहे.
यावेळी खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या. महाराष्ट्रात नागपूर, अमरावती, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण अश्या पाच जागांसाठी ही निवडणुक होत आहे. पाचही मतदारसंघांमध्ये भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडी आमने सामने उभी ठाकली आहे. अश्यात आमरावती येथे डॉ. रणजित पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये नवनीत राणा यांनी केलेल्या भाषणाचा व्हिडियो सध्या व्हायरल होत आहे.
काय म्हणाल्या राणा?
आमच्या मनातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. सर्वांना आपणच मुख्यमंत्री वाटता. ज्यापद्धतीने आपण आमची कामे करता त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी बघण्याची आमची मनापासून इच्छा आहे. आपण मुख्यमंत्री आहात याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही, असे खासदार नवनीत राणा भाषणादरम्यान म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. – खा.नवनीत राणा
यावर तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करून सांगा #maharashtratoday #devendra_fadnavis #navneetrana pic.twitter.com/e4R4n97joT— Maharashtra Today (@mtnews_official) January 11, 2023
राजकारण तापलं
नवनीत राणा यांच्या विधानानंतर विरोधकांना आयतं कोलीत मिळालं. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या विधानात आश्चर्य वाटून घेण्यासारखं काहीच नाही, असं म्हटलं आहे. यापूर्वी स्वतः एकनाथ शिंदेही तेच म्हणाले होते. भाजपचे चंद्रकांत पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेही तेच म्हणत असतात. आम्ही तर नेहमीच म्हणतो की शिंदे हे भाजपला न पचलेले मुख्यमंत्री आहेत. आणि राणाही असं काही पहिल्यांदा बोलल्या नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. शिंदे गटाचे शंभूराजे देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री राम-लक्ष्मणाप्रमाणे हातात हात घालून काम करीत आहेत, असे म्हटले आहे.
MP Navneet Rana Says Devendra Fadnavis is CM
Politics Amravati BJP