नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासदार आणि भाजपच्या समर्थक नवनीत राणा पुन्हा आक्रमक झाल्या आहेत. आणि त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना खुले आव्हान दिले आहे. संजय राऊत म्हणाले की, नागपूर येथील अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार आहोत. महाराष्ट्रात फिरुन तुमची झोप उडवणार, कारण तुमची पाप भरली आहेत. मी ज्या कोठडीत होतो, त्यात तुम्हालाही टाकणार, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला होता. यावरून आता खासदार नवनीत राणांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणता बॉम्ब कोण फोडणार, यात विदर्भातील जनतेला रस नाही, असे सांगत राणा यांनी उद्धव टाकरे यांनाही लक्ष्य केले आहे.
नवनीत राणा पुढे म्हणाल्या की, सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी मोठा बॉम्ब फोडला तर सगळ्यांना भारी पडेल, संजय राऊत यांच्या पक्षातील ४० आमदार बाळासाहेबांचे विचार अर्थात भाजपाबरोबर गेले आहेत. हा बॉम्ब आधीच फुटला आहे. आता जो बॉम्ब फुटेल कदाचीत आदित्य ठाकरे किंवा उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील. देवेंद्र फडणवीसांनी बॉम्ब फोडला, तर संजय राऊतांना कुठे पळायचे आणि कुठे लपायचे सुचणार नाही. त्यामुळे बॉम्ब फोडण्याची भाषा विदर्भ आणि नागपूरमध्ये करु नये, असेही राणांनी म्हटले आहे. नवनीत राणा यांनी विरोधी पक्ष आणि शिवसेना नेत्यांवर कडक शब्दात प्रहार केला. तसेच, उद्धव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल, असे आव्हानही राणा यांनी दिले.
राणा म्हणाल्या की, जनतेला फटाक्यात रस नाही. अधिवेशन जनतेच्या पैशातून होते, त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलले पाहिजे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व काम तोंडपाठ आहेत. पण उद्धव ठाकरे यांना एकही प्रपोजल तोंडपाठ नाही. त्यांनी विदर्भात एकही कामाचा उद्घाटन केले नाही, जनतेला काम हवे आहेत. तसेच आरोप प्रत्यारोपसाठी अधिवेशन नाही, जनतेच्या पैशातून अधिवेशनात खर्च केला जातो. कोणता बॉम्ब कोण फोडेल यात जनतेला रस नाही. खूप सारे विषय आहेत, फडणवीसांच्या कामातून व्हिजन दिसते. उपमुख्यमंत्री यांना फटाके फोडण्यात काही रस नाही. त्यांना कामात इंटरेस्ट आहे. समृध्दी महामार्ग, मेडिकल काम यात व्हिजन दिसून येते असेही राणा यांनी म्हटले आहे.
MP Navneet Rana Open Challenge to Shivsena MP Sanjay Raut