विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
दणदणीत बहुमत असूनही गेल्या अनेक महिन्यांपासून अतिरीक्त विभागांच्या ओझ्याखाली काम करणारे केंद्रीय मंत्रिमंडळ अखेर विस्तारीत होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त ठरला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून यासंदर्भातील चर्चा सुरू होत्या. अखेर बुधवारी सायंकाळी ६ वाजता मंत्रिमंडळ विस्तार संपन्न होणार आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यात तरुण खासदारांना संधी दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्रातून कुणाला संधी
महाराष्ट्रातून कोणत्या खासदाराला संधी मिळेल, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातून एक आणि कोकणातून एका खासदाराला संधी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याअनुषंगाने ही दोन्ही नावे चर्चेत आहेत.
अनेक पदे रिक्त
काही मंत्र्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे तसेच काहींचे निधन झाल्यामुळे कॅबिनेटमधील चार मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. एनडीएतून बाहेर पडलेल्या पक्षांच्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानेही पदे रिक्त आहेत. त्यांची अतिरिक्त जबाबदारी काही वरिष्ठ मंत्र्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी होती. शिवसेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पर्यावरण खात्यासह २०१९ पासून अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार आहे.
लोजपाचे नेते रामविलास पासवान यांच्या निधनानंतर ऑक्टोबरपासून ग्राहक संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे आहे. पासवान यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्रिमडळामध्ये एकही भाजपेतर मंत्री नाही. रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले हेच फक्त राज्यमंत्री उरले आहेत. अशाच प्रकारे कृषी, ग्रामीण विकास आणि पंचायती राज असे तीन मंत्रालय सांभाळणारे नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे हरसिमरत कौर यांनी राजीनामा दिलेल्या खाद्य मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे श्रीपाद नाईक यांच्या आयुष मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. जानेवारीमध्ये एका रस्ता अपघातात श्रीपाद नाईक गंभीर जखमी झाले होते. ते सध्या पूर्णपणे बरे झालेले नाहीत.