मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोप असलेले अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. सक्तवसुली संचालनालयाने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. नवाब मलिक यांचे दाऊद टोळीशी संबंध होते. मलिक जाणूनबुजून आणि थेट मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.
विशेष न्यायाधीश आर. एन. रोकडे यांनी या प्रकरणाची सुनावणी घेतली. हे प्रकरण पुढे नेण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत. नवाब मलिक जाणूनबुजून या प्रकरणात सहभागी झाले होते. हे प्राथमिकदृष्ट्या पुराव्यांमध्ये समोर आले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
गोवावाला कंपाउंडचा ताबा मिळविण्यासाठी नवाब मलिक यांनी कट रचला. त्यासाठी नवाब मलिक, त्यांचे भाऊ आणि दाऊदची बहीण हसिना पारकर, त्यांचा अंगरक्षक सलीम पटेल यांच्यात अनेक बैठका झाल्या होत्या. असे ईडीने मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केले आहे.
ईडीने आपल्या आरोपपत्रात १७ जणांना साक्षीदार बनवले आहे. यामध्ये दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर आणि हसिना पारकरचा मुलगा अली शाह पारकर याच्यासह सरदार शाहवली खान यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. हसिना पारकर ही दाऊदच्या निकटवर्तीयांमध्ये होती. सलीम पटेल हा पारकरचा अंगरक्षक होता. हसिना पारकर हिच्या निर्देशावरून मालमत्तेबाबतचा प्रत्येक निर्णय पटेल घेत होता.
ईडीच्या आरोपपत्रात हसिना पारकरचा मुलगा अली शाह पारकरचा जबाब आहे. त्यानुसार अली शाह याने ईडीला सांगितले, की त्याची आई हसिना पारकरने २०१४ मध्ये तिच्या मृत्यूपर्यंत दाऊदसोबत आर्थिक व्यवहार केले होते. सलीम पटेल तिच्या साथीदारांपैकी एक होता. हसिना पारकरने सलीम पटेल याच्यासोबत मिळून गोवावाला कंपाउडचा वाद मिटवला होता. तिथे कार्यालय उघडून त्यातील एक भाग आपल्या ताब्यात घेतला होता. त्यानंतर तो मलिक यांना विकला होता.
विशेष न्यायालयाने आरोपपत्राची दखल घेत मलिक आणि १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी सरदार शाहवली खान याच्याविरुद्ध कारवाई पुढे सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. नवाब मलिक आणि सरदार शाहवली खान यांना ईडीने आरोपपत्रात आरोपी बनवले आहे. मालमत्तेची संपूर्ण कारवाई सरदार खान याच्या माध्यमातून झाली होती.