इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे या नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतात. नकारात्मक भूमिका साकारल्या तरी आपल्या नैसर्गिक अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांनी या मालिकेत ‘वच्छी आत्या’ ही भूमिका साकारली होती. काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा अपघात झाला. त्यानंतर त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर दमदार कमबॅक केले. काही दिवसांपासून त्या आजारी असल्याची अफवा पसरवण्यात येत आहे. नुकतंच त्यांनी यावर उत्तर दिले आहे.
वर्षा दांदळे नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असतात. त्या नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. काही महिन्यांपूर्वी वर्षा दांदळे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. भंडारदरा येथील एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. तेव्हापासून वर्षा या अंथरुणात होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू होते. आता त्या ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत. या आधी त्यांनी ‘बॉस माझी लाडाची’ ही मालिका, ‘रानजाई’ या चित्रपटात काम केले आहे.
एका ऑनलाईन पोर्टलने अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्याबद्दल अफवा पसरवणारी बातमी केली होती. वर्षा दांदळे या अंथरुणाला खिळून आहेत, असे त्यात म्हटले होते. त्यांची अवस्था पाहून धक्का बसेल असेही यात म्हटले आहे. यावर वर्षा दांदळे यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली. त्यांनी या बातमीखाली, ‘मी छान ठणठणीत आहे’, अशी कॉमेंट केली आहे. ‘कोण आहेत ही माणसं. यांना कामधंदे नाहीत का काही” अशी संतापजनक प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे. त्यावर त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. वर्षा यांच्या चाहत्यांनीही विविध कमेंट्स करत पाठिंबा दिला आहे. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांचा निषेध अशा प्रतिक्रियाही या वृत्तावर पाहायला मिळत आहेत.
वर्षा तांदळे यांनी ‘पाहिले नं मी तुला’, या मालिकेत काम केले आहे. त्यांनी या मालिकेत उषा म्हणजेच अनिकेतच्या आईचे पात्र साकारले आहे. ही मालिका फारच लोकप्रिय ठरली होती. ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. तसेच वर्षा यांनी ‘एकाच या जन्मी जणू’, ‘आनंदी हे जग सारे’, यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी ‘सवेरेंवाली गाडी’ या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. सध्या त्या ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये राघवच्या आईची भूमिका साकारत आहेत.
Marathi Actress Varsha Dandale Health Angry