प्रतिनिधी, कोल्हापूर
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या आग्रही मागणीसाठी आजपासून राज्यस्तरीय मूक मोर्चा आंदोलन सुरू झाले आहे. खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरु झाले आहे. आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत असून अनेक नेत्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी १६ जूनपासून आंदोलनाला सुरुवात केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. त्यानुसार आज मूक आंदोलन करण्यात आले. आरक्षणाचे जनक असलेल्या छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी मराठा नेत्यांनी हे आंदोलन केले. या आंदोलनास अनेकांनी पाठिंबा दिला असून विविध पक्षाच्या नेत्यांनी येथे हजेरी लावली.
आंदोलनाची क्षणचित्रे आणि छायाचित्रे अशी
– वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनस्थळी येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला
– महाविकास आघाडीचे मंत्री हसन मुश्रीफ हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले
– खासदार धैर्यशील माने हे थेट सलाईन घेऊनच आंदोलनस्थळी दाखल झाले
– श्रीमंत शाहू छत्रपती यांनीही आंदोलनात सहभाग घेतला. मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
– खासदार उदयनराजे भोसले हे सुद्धा आंदोलनात सहभागी झाले.
– भर पावसात हे आंदोलन होत असल्याने त्याकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले गेले आहे.
– राज्य सरकार आंदोलकांच्या मागण्यांसोबत आहे. याप्रश्नी आवश्यक तो निर्णय घेतला जाईल, असे मंत्री सतेज पाटील यांनी आंदोलकांना सांगितले
– कोल्हापूर जिल्हा व परिसरातील अनेक लोकप्रतिनिधींनी आंदोलनस्थळी भेट देऊन आपली भूमिका मांडली