येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येवला शहर उड्डाणपूल किंवा बायपाससह मालेगाव,मनमाड,येवला,कोपरगाव रस्त्याचे सहापदरी कॉंक्रीटीकरण करण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच येवला तालुक्यातील मनमाड रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ७४,७६,७७ येवला शहरा जवळील नांदगाव रोड,नागडे रोड आणि नांदेसर रोडच्या रेल्वे गेटच्या जागी रोड ओव्हर ब्रिज उभारण्यासाठी सेतुबंधन योजनेतून केंद्र सरकार कडून तातडीने प्रस्ताव मागविला जाईल अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी खासदार समीर भुजबळ यांना दिली आहे.
राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार येवला विधानसभा मतदारसंघातील विविध रस्ते व पुलांच्या कामांबाबत आज दिल्ली येथे समीर भुजबळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. तसेच त्यांना या कामांबाबत निवेदने दिले. यावेळी या विकास कामांबाबत मंत्री नितीन गडकरी यांच्याशी समीर भुजबळ यांनी सविस्तर चर्चा केली.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांचे विविध कामांबाबतचे पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देत राष्ट्रीय महामार्ग मूळ (NHO2) प्रकल्प वार्षिक कार्यक्रम २०२५-२६ अंतर्गत येवला शहर उड्डाणपूल किंवा बायपाससह मालेगाव मनमाड येवला कोपरगाव रस्त्याचे अपग्रेडेशन करून सहापदरी कॉंक्रीटीकरण रस्ता तातडीने मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच या रस्त्यावरील होणारी मोठी वाहतूक तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतातील भाविकांना नाशिक त्र्यंबकेश्वर येथे येण्यासाठी हा प्रकल्प अतिशय महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी तातडीने या रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने येवला तालुक्यात सेतूबंधन योजनेमधून दौंड मनमाड रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग क्रमांक ७४,७६,७७ येवला शहरा जवळील नांदगाव रोड,नागडे रोड आणि नांदेसर रोडच्या रेल्वे गेटच्या जागी रोड ओव्हर ब्रिज (ROB) मंजूर करण्यात यावा. ज्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी दक्षिणेकडील नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि शिर्डी येथे येणाऱ्या साई भक्तांना सुविधा मिळेल अशी मागणी माजी खासदार समीर भुजबळ यांनी केली. यावर या तीन ओव्हर ब्रिजच्या कामांसाठी सेतुबंधन योजनेतून राज्यशासनाकडून तातडीने प्रस्ताव मागवून ही कामे मंजूर करण्यात येतील अशी माहिती मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
त्याचबरोबर २०२५-२६ दरम्यान महाराष्ट्र राज्य (जिल्हा नाशिक) मध्ये सीआरएफ अर्थात सुधारित मध्यवर्ती रस्ते आणि पायाभूत सुविधा निधीतून मंजूर करण्यात येणाऱ्या कामांच्या अंतर्गत येवला मतदारसंघातील रस्त्यांना निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यामध्ये पुढच्या टप्प्यात या रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
या रस्त्यांच्या कामांचा आहे यामध्ये समावेश….
येवला शहरातील अतिरिक्त जिल्हा कोर्ट ते रेल्वे स्टेशन रोड एमडीआर ७९ पर्यंतच्या रस्त्यावर किमी. ०/३६० येथे लघु पुलाचे बांधकाम आणि सीएच. किमी. ०/००० ते ४/५०० पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम आणि रुंदीकरण करणे ९ कोटी, बिटुमन तार रस्ता आणि रस्ता रुंदीकरणासह SH 412 येवला नागडे धामणगाव भारम ते NH 752 G पर्यंत KM 0/000 ते 1/600,7/200 ते 7/800 आणि 8/200 ते 15/400 पर्यंत कनेक्टरची सुधारणा करणे ७ कोटी ५० लाख,येवला-गणेशपूर(सुकी)-हडपसावरगाव-जयदरे (MDR-162) किमी 0/00 ते 3/600 पर्यंत मजबुतीकरण ५ कोटी, अहमदनगर जिल्हा सीमा ते रेंडाळे (MDR-७७) किमी ३/६०० ते किमी ६/७०० आणि किमी १०/८०० ते किमी १६/८०० रस्ता मजबुतीकरण करण्यासाठी १० कोटी, अंगणगाव-पारेगाव ते रेल्वे स्टेशन MSH-८ (प्रस्तावित बायपास रस्ता) किमी ०/०० ते किमी ५/०० या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी ४ कोटी ४० लाख, तर निफाड तालुक्यातील नैताळे ते देवगाव रस्ता (MDR-१२६) किमी १२/८०० ते २७/४०० या रस्त्याचे मजबुतीकरण आणि रुंदीकरण करण्यासाठी १५ कोटी अशा एकूण ५० कोटी ९० लाख रुपयांच्या रस्त्यांचा समावेश आहे.