मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुव्दारा मनमाड मध्ये दरवर्षी गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या ३५६ व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दिनांक १६ , १७ आणि १८ डिसेंबर रोजी गुरुव्दारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अखंड पाठ, भजन, कीर्तन, लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उत्सवास आज पासून प्रारंभ झाला आहे. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुव्दाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असून या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव मान्यवर आणि कलाकार सहभागी होणार आहे. १८ डिसेंबर (रविवार) दुपारी ३ वाजता गुरुव्दारापासून संपूर्ण मनमाड शहरामध्ये भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. सालाना जोडमेला उत्सवात शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान मनमाड गुरुद्वारा प्रबंधक संत श्री बाबा रणजितसिंहजी यांनी केले आहे.