मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मालेगाव येथील शिव महापुराण कथेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खा.श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी खा. शिंदे यांनी सनातन धर्म व संताच्या प्रबोधनाची आजच्या समाजाला गरज असून शिव महापुराण कथेच्या माध्यमातून पंडित प्रदीप मिश्रा हे ते काम करीत आहे. अशा प्रबोधनातून शास्त्र व सनातन धर्माचे संस्कार पुढील पिढीला मिळतील अशी प्रतिक्रिया मालेगावात दिली. नाशिकचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मालेगावात शिव महापुराण कथेचे आयोजन केले असून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून सुरू असलेल्या या कथेला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव तथा खा.श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली त्यांच्या समवेत पालकमंत्री दादा भुसे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रदेश सचिव भाऊसाहेब चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी खा.शिंदे यांनी कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांचा व्यासपीठावर जावून सन्मान केला. साधू संतांनी शिकवलेल्या सनातन धर्माचे आचरण व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवलेल्या हिंदुत्वाच्या मार्गावर सध्या मार्गक्रमण सुरू असल्याचेही खा.श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. या महापुराण कथेस राज्यभरातून लाखो भाविक कार्यक्रमाला हजर राहून कथेचे श्रावण करीत आहे.