नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– महावितरण मध्ये कनिष्ठ अभियंता ते संचालक या पदापर्यंत प्रवास करताना कंपनीची प्रगती, ग्राहक सेवा आणि कर्मचारी हित नेहमीच जोपासले. पुणे परिमंडळ येथे मुख्य अभियंता पदावर कार्य करताना कंपनीमध्ये पहिल्यांदाच जे ग्राहक सेवेसंदर्भातील नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविले, ते संपूर्ण ग्राहक सेवेचे कार्य “नाते प्रकाशाचे” या येणाऱ्या माझ्या पुस्तिकेच्या माध्यमातून लवकरच सर्वांपर्यंत पोहचविणार असून, हे पुस्तक अभियंते व कर्मचाऱ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केले. ते रविवारी नाशिक येथे सभागृहात सबोर्डिनेट इंजिनीयर असोसिएशन, नाशिक व मालेगाव मंडळ यांच्या वतीने आयोजीत गौरव सोहळ्यात आभार व्यक्त करताना करताना बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा एसईएचे केंद्रीय अध्यक्ष लक्ष्मण राठोड, नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे, मुख्य अभियंता (वितरण) अंकुर कावळे, एसईएचे सरचिटणीस संतोष खुमकर, एसईएचे पदाधिकारी किरण जाधव, श्रीनिवास बोबडे, संजय ठाकूर व नारायण चकोर उपस्थित होते.
मूळचे नाशिककर असलेले आणि नाशिकमध्ये अनेक वर्ष महावितरणमध्ये सेवा दिल्यानंतर नुकतेच महावितरण मधील उच्चपदावर विराजमान झाल्याबद्दल मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार आणि मुख्य अभियंता (वितरण) अंकुर कावळे यांचा सबओर्डीनेट इंजिनीयर असोसिएशनतर्फे नाशिक येथे आयोजित सत्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
पुढे बोलताना राजेंद्र पवार म्हणाले की, पुणे परिमंडळात सर्वांना सोबत घेऊन विविध कार्य केले असून विविध योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून सौर क्षमता वाढविली. अनेक योजना आणि सेवांमध्ये ग्राहक जनजागृती सोबतच प्रचंड सुधारणा करीत पुणे परिमंडळाला सर्वोच्च स्थानी पोहचविले. यापुढेही महावितरणच्या राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन विविध उपाययोजना रविण्यात येणार असून, कार्यपद्धतीत अमुलाग्र सकारात्मक बदल करण्यासाठी प्रयत्नरत राहणार असल्याचे संचालक राजेंद्र पवार यांनी आश्र्वासित केले. मुख्य अभियंता अंकुर कावळे त्यांनी सुद्धा गौरव केल्याबद्दल आभार व्यक्त करीत आणखी उत्कृष्ट काम करण्याची ग्वाही दिली.
सोहळ्याच्या सुरुवातीला मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेला संचालक राजेंद्र पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले. तसेच राजेंद्र पवार यांच्या कार्यकर्तृत्वाची चित्रफित दाखविण्यात आली.मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केलेल्या मनोगतामध्ये संचालक राजेंद्र पवार यांच्याकडून सर्व महावितरणच्या अभियंत्यांना व कर्मचाऱ्यांना सकारात्मक बदल व वातावरण याबद्दल अपेक्षा असून ते नक्कीच पूर्ण करतील मत व्यक्त केले. तसेच अभियंते राजेंद्र भांबर, किरण धनाईत व एस. पी. अहिरे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.
गौरव सोहळ्याचे प्रास्ताविक संघटनेचे सहसचिव विशाल मोरे यांनी तर संचालन वीणा दिघे यांनी आणि आभार प्रदर्शन संघटनेचे सहसचिव राहुल महाले यांनी केले. यावेळी नाशिक व मालेगाव मंडळातील एसईए संघटनेचे सभासद असलेले अभियंते बहुसंख्येने उपस्थित होते.