नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाजकल्याण विभागात एजंट सापडून एक दिवस होत नाही तोच सिडकोतील महावितरण कार्यालयात एक एजंट लाच घेताना पडकला गेला आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट असल्याची बाब समोर येत आहे.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिडकोतील सिंहस्थ नगर येथे राहणाऱ्या राहुल ज्ञानेश्वर पवार या व्यक्तीस १५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. एका व्यक्तीने वीजेचे मीटर मिळावे यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र, हे मीटर मिळवून देण्यासाठी पवार याने १५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर एसीबीकडे तक्रार देण्यात आली. एसीबीच्या पथकाने सापळा लावला. आणि शिंदे येथील महावितरण कार्यालयात १५०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. त्यानंतर पवार यास अटक करण्यात आली आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीने केले आहे.