नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र – कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज तातडीने बैठक घेण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आज बैठक झाली.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई हे तातडीने दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या वादावर मध्यस्थी केली. सीमावादाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्राच्या खासदारांच्या शिष्टमंडळानेदेखील तीन दिवसांपूर्वी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान अमित शाह यांनी या प्रकरणावर मध्यस्थी करण्याची आणि तोडगा काढण्याची विनंती केली होती.
बैठकीनंतर शहा म्हणाले…
यै बैठकीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, दोन्ही मुख्यमंत्र्यांसह अधिकाऱ्यांशी गृहविभागाची चर्चा झाली. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी वादावर तोडगा काढण्यासाठी सकारात्मकता दाखविली आबे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणीही यावर बोलणार नाही. दोन्ही राज्यांच्या वतीने प्रत्येकी तीन याप्रमाणे सहा मंत्र्यांमध्ये बैठक होईल. त्यानंतर ते या मुद्द्यांवर चर्चा करतील. यामध्ये स्थानिक पातळीवरील प्रश्नांवरही दोन्ही बाजूंकडील कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यावी. यामध्ये प्रवाशी, व्यापारी यांना त्रास होता कामा नये. यासाठी दोन्ही बाजूंनी आयपीएस अधिकारी नेमण्याची तयारी दाखवली आहे, असे शहा म्हणाले.
शहा यांनी स्पष्ट केले की, दोन्हीकडच्या संघर्षात फेक ट्विट केले गेले असंही समोर आलं आहे. त्यामुळं अशा प्रकारचे फेक ट्विट्स जिथं समोर आले आहेत तिथं गुन्हा दाखल केला जाईल. तसेच ज्यांनी हे केलं आहे त्यांना जनतेसमोर आणले जाईल. मी दोन्हीकडील नेत्यांना सांगेल की राजकीय कार्यक्रम ते घेऊ शकतात पण ते जनतेच्या हिताचे असावेत. यामध्ये राजकारण करु नये, यामध्ये जी कमिटी स्थापन केली आहे त्याचं काम तसेच सुप्रीम कोर्टाचा निर्णय याची वाट पाहावी, अस आवाहनही शहा यांनी केले.
LIVE | Hon’ble Home Minister @AmitShah ji addressing the media in NewDelhi after chairing a meeting on the Maharashtra-Karnataka border issue.https://t.co/S5fF3mLDLy
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) December 14, 2022
महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा
सीमावादावरुन महाविकास आघाडीदेखील चांगलीच आक्रमक झाली आहे. सीमावादाच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकार गप्प असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन महाविकास आघाडी येत्या १७ डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहे.
Maharashtra Karnataka Border Issue Decisions
CM Shinde DYCM Fadanvis Delhi Tour Meeting
Amit Shah Politics