इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केरळमधील अलाप्पुझाच्या नैऋत्येस अंदाजे 15 नॉटिकल मैल अंतरावर 25 मे 2025 रोजी लायबेरियन कंटेनर जहाज एमव्ही एमएससी ईएलएसए 3 बुडाल्यानंतर भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) प्रदूषण प्रतिसाद मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू केली. जहाज बुडाल्यानंतर काही तासांतच आयसीजीच्या टेहळणी विमानाला त्या ठिकाणी तेल गळती आढळून आली. प्रदूषण प्रतिसादासाठी आधीच तैनात असलेल्या आयसीजी जहाज सक्षमने ताबडतोब कार्यवाहीला सुरुवात केली. आयसीजी डॉर्नियर विमानाने हवाई मूल्यांकन केले आणि प्रभावित क्षेत्रात तेल विद्राव्य रसायन (ओएसडी) पसरवले.
25 मे रोजी उशिरा सकाळी तेलाचा थर बुडालेल्या ठिकाणापासून पूर्व-आग्नेय दिशेला 1.5 ते 2 नॉट्स वेगाने वाहताना दिसला. समुद्राची खवळलेली परिस्थिती आणि जोरदार वारे यामुळे बचाव कार्य अधिक आव्हानात्मक बनले. धोकादायक परिस्थिती असूनही, 100 हून अधिक माल कंटेनर या परिसरात तरंगत असताना, काही तुटून त्यातील सामग्री बाहेर पडताना, तटरक्षक दलाने पूर्ण प्रभावीपणे काम सुरू ठेवले. सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी या भागातून जाणारी सर्व जहाजे वळवण्यात आली आहेत आणि तरंगत्या ढिगाऱ्यांमुळे आणि संभाव्य धोक्यांमुळे खलाशांना सावधगिरीने जलवाहतूक करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तटरक्षक दलाने हवाई उड्डाणे आणि विशेष गतीरोधक उपकरणांचा वापर करून देखरेख ठेवली आणि गळती कमी करण्याचे तीव्र प्रयत्न केले. दोन ऑफशोअर पेट्रोल व्हेसल्स (ओपीव्ही) चोवीस तास देखरेखीसाठी सज्ज आहेत, तर प्रदूषण प्रतिसाद जहाज समुद्र प्रहरी आणि अतिरिक्त ओपीव्ही मोठ्या प्रमाणात तेल विद्राव्य रसायनासह तैनात करण्यात आली आहेत.
मर्केंटाइल मरीन डिपार्टमेंट, कोचीने मर्चंट शिपिंग ॲक्ट, 1958 अंतर्गत मेसर्स एम एस सी च्या जहाज मालकांना प्रदूषण दायित्वाचा इशारा जारी केला आहे. एमएससीने कंटेनर रिकव्हरी, तेल काढून टाकणे आणि पर्यावरणीय स्वच्छतेसाठी टी अँड टी साल्व्हेजची नियुक्ती केली आहे. तटरक्षक दलाने केरळ राज्य प्रशासनाला किनारपट्टी स्वच्छतेसाठी तयारी करण्याचा तसेच स्थानिक समुदायांना किनाऱ्यावर वाहून आलेला कोणताही माल किंवा कचरा हाताळू नये यासाठी सतर्क करण्याचा सल्ला दिला आहे.