योगेश सगर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील मौजे सुकेणे शिवारात आज दि. ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबटयाला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले आहे –
मौजे सुकेणे, कसबे सुकेणे , ओने , खेरवाडी आणि चांदोरी या शिवारात गेल्या काही दिवसांपासून अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. तसेच या बिबट्याने या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाळीव प्राण्यावर हाल चढवून त्यांना ठार केले होते. त्यामुळे या बिबट्याची मोठी दहशत या परिसरात होती. दरम्यान मौजे सुकेणे शिवारात संदेश मोगल व सतीश मोगल यांच्या वस्तीवर बिबट्याचा संचार असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या माहितीप्रमाणे निफाड वनविभागाने मोगल यांच्या वस्तीवर गेल्या आठवड्यात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात आज दि ५ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास हा बिट्या जेरबंद झाला आहे. बिबट्या जेरबंद झाल्याचे लक्षात आल्यांनतर शेतकऱ्यांनी निफाड वनविभागाशी संपर्क साधला. त्यांनतर वनविभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी पंचनामा करून सदरच्या बिबटयाला वनविभागाच्या विशेष वाहनातून निफाड येथे नेण्यात आले आले. निफाड येथील वनविभागाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या बिबट्याची तपासणी करून त्यास वनविभागाने नैसर्गिक अधिवासात सोडले असल्याचे निफाड वनविभागाने सांगितले आहे.
Leopard Catch by Forest Department in Niphad Taluka