कृषी बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली माहिती
लासलगांव – नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज २४ मे पासून सुरू झाल्यानंतर गेल्या २५ दिवसांत लासलगांव बाजार समितीत विक्रमी कांदा आवक झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यातील कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन जिल्हाधिकारी यांनी १२ ते २३ मे, २०२१ अखेर नाशिक जिल्ह्यात कडक लॉकडॉऊनची अंमलबजावणी करून सर्व बाजार समित्यांचे शेतीमाल लिलावाचे कामकाज बंद केले होते. त्यानंतर २४ मे पासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे लिलावाचे कामकाज पुर्ववत सुरू झाले. २४ मे ते २० जून या कालावधीत लासलगांव बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर ११,४३,१४१ क्विंटल कांद्याची विक्रमी आवक होऊन १,७१,४७,११,५०० इतक्या रक्कमेची उलाढाल झाली आहे.
गेल्या वर्षी वरील कालावधीत बाजार समितीच्या लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर ६,२५,७४७ क्विंटल कांद्याची आवक होऊन ५०, १८,४९,०९४ इतक्या रकमेची उलाढाल झाली होती. त्यामुळे मागील वर्षाच्या वरील कालावधीतील कांदा आवकेच्या तुलनेत चालु वर्षी लासलगांव मुख्य, निफाड व विंचुर उपबाजार आवारांवर ५,१७,३९४ क्विंटल कांद्याची जादा आवक होऊन रू. १,२१,२८,६२,४०६ इतक्या रकमेची जादा उलाढाल झाली आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत मागील वर्षापेक्षा सध्याच्या सरासरी बाजारभावात देखील ७०० रूपयांनी वाढ झाली आहे.
सद्यस्थितीत कांद्याचे सरासरी बाजारभाव स्थिर असून शेतकरी बांधवांनी त्यांचा कांदा हा शेतीमाल योग्य प्रतवारी करून बाजार आवारावर विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीच्या सभापती सौ. सुवर्णा जगताप यांनी केले आहे.