इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे भरधाव बेस्ट बस गर्दीत घुसली. त्यानंतर रस्त्यावर चालणाऱ्या अनेक नागरिकांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या अपघातात अनेक वाहनांनाना धडक दिल्यामुळे त्यांचेही नुकसान झाले आहे. याघटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचं आपत्ती व्यवस्थापक पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले या घटनेतील जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बेस्ट बस रूट क्र.३३२ कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना हा अपघात बुद्ध कॉलनी जवळील आंबेडकर नगर येथे झाला.भरधाव बसने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली, अनेक पादचाऱ्यांना अक्षरश: चिरडलं. बेस्ट बसने अनेक रिक्षांना धडक दिली त्या रिक्षांमध्ये प्रवासीदेखील होते. अपघातग्रस्त बेस्ट बसचा चालक हा मद्यधुंद होता, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेनंतर भाजप नेते विनोद तावडे यांनी म्हटले आहे की, मुंबईतील कुर्ला येथे बेस्टच्या बसला झालेल्या अपघातात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. स्थानिक प्रशासन सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. मृतांना त्यांच्या चरणी स्थान द्यावे आणि जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो.