नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कुंभ काळात शाही स्नानासाठी गोदावरीला अविरल ठेवण्यासाठी, धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याचे, नवीन धरण बांधण्याचे नियोजन करीत असून त्याबाबत याचिककाकर्ते राजेश पंडित यांनी जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिले असून ते चर्चेत आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, आपणास आत्तापासूनच माहिती असावी आणि त्याअनुषंगाने नियोजन व्हावे म्हणून हे निवेदन. मुंबई उच्च न्यायालयाने PIL/154/2015 मध्ये स्पष्ट आदेश केले आहेत की कुंभमेळासाठी, शाही स्नानासाठी धरणातून पाणी सोडायच नाही (मुंबई उच्च न्यायालय आदेश दि 22/12/2016) तसेच गत कुंभमेळ्यात गंगापूर धरणामधून जो पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तो उच्च न्यायालयाने असंवैधानिक ठरवून एक चौकशी समिती स्थापन केली होती. त्यावर 18/01/2019 ला अंतिम निकाल दिला होता ( सोबत सॉफ्ट कॉपी जोडत आहोत) तो आपणास माहीत आहेच.
तरी आपणास विनंती आहे की संबंधित सर्व विभागांना आदेश द्यावेत की धरणातून पाणी सोडून प्रदूषण कमी करण्यापेक्षा प्रदूषणच कसे होणार नाही. अथवा होत असलेले कसे थांबेल, गोदावरी पुनर्जीवित कशी होईल, पूर्वी प्रमाणे स्वयंप्रवाहित कशी होईल, त्यासाठी तिचे सर्व जलस्रोत कसे पुनर्जीवित होतील याचे नियोजन करावे. निरीनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, गत कुंभमेळ्यासाठी दिलेल्या सर्व सूचनांच्या अंमलबजावणी साठीचे नियोजन करावे जेणेकरून कुंभमेळ्यात अमृत स्नानासाठी धरणातून पाण्याच्या विसर्गाची गरजच पडणार नाही. तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी आहे. दुष्काळजन्य परिस्थतीचा विचार केला तरी गोदावरीला पुनर्जीवित करणे हाच मार्ग आहे.