पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी सुधारित प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्यानुसार २७ फेब्रुवारी २०२३ रोजी सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे.
प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रकिया सुरू केली असून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी २४५ बाजार समित्यांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यापूर्वी प्रारुप मतदार याद्या तयार करण्यासाठी १ सप्टेंबर २०२२ हा अर्हता दिनांक निश्चित केला होता. तथापि, शासनाच्या ७ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या अधिसूचनेनुसार नव्याने निवडून आलेल्या प्राथमिक सहकारी पतसंस्था, बहुद्देशीय सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्या सदस्यांना अंतिम मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आवश्यक असल्याने पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यामध्ये या नवीन सदस्यांना समाविष्ट करुन सुधारित प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
१ सप्टेंबर २०२२ या अर्हता दिनांकानंतर राज्यातील ९ हजार ५२५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. उच्च न्यायालयाने नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत सहभागी होता यावे यासाठी ३० एप्रिल २०२३ अथवा त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत प्राधिकरणास आदेश दिले आहेत. पूर्वीच्या अंतिम यादीत समावेश असलेले परंतु या कालावधीत निवडणूक न लढवलेले आणि पराभूत झालेले सदस्य अपात्र झालेले आहेत.
सुधारित मतदार यादी कार्यक्रमानुसार १० ते २४ फेब्रुवारी या कालावधीत १ सप्टेंबर २०२२ नंतर नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची नावे समाविष्ट करुन व प्रतिनिधीत्व संपुष्टात आलेल्या सदस्यांची नावे वगळून अंतिम मतदार यादीत सुधारणा करण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यानुसार सुधारीत प्रारुप मतदार यादी २७ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रारुप मतदार यादीमध्ये २७ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२३ या कालावधीत आक्षेप/ हरकती घेता येतील. प्राप्त झालेल्या हरकतींवर १७ मार्च २०२३ पर्यंत निर्णय घेऊन २० मार्च २०२३ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
२० मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीमध्येही नव्याने निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश नसल्यास त्यांना बाजार समितीच्या निवडणूकीकरीता नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येईल, असेही आयुक्तांनी कळवले आहे.