इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ कंपनीने एप्रिल 2025 महिन्यात आपल्या नेटवर्कवर विक्रमी 26 लाख 44 हजार नवीन ग्राहकांची भर घातली आहे. त्यामुळे जिओच्या एकूण ग्राहकांची संख्या आता 47 कोटी 24 लाखांपेक्षा अधिक झाली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) यांनी नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, याच कालावधीत एअरटेल केवळ 1 लाख 70 हजार ग्राहक जोडू शकला आहे, तर व्होडाफोन-आयडिया कंपनीला सर्वाधिक फटका बसला असून तिने सुमारे 6.5 लाख ग्राहक गमावले आहेत.
ट्रायनुसार, देशभरातील एकूण मोबाइल कनेक्शनची संख्या आता 115 कोटी 89 लाखांवर पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात गुजरात, बिहार आणि दिल्ली सर्कलमध्ये सर्वाधिक नवीन ग्राहक जोडले गेले आहेत, तर मुंबई आणि कोलकाता सारख्या सर्कल्समध्ये ग्राहकांची घट झाली आहे.
एप्रिल अखेरपर्यंत जिओकडे सुमारे 47 कोटी 24 लाख ग्राहक असून, मोबाईल ग्राहकांमध्ये 40.76% बाजारपेठ हिस्सा मिळवून जिओ आघाडीवर आहे. एअरटेलकडे सुमारे 39 कोटी ग्राहक असून त्याचा बाजार हिस्सा 33.65% आहे. तर व्होडाफोन-आयडिया कडे सुमारे 20 कोटी 47 लाख ग्राहक असून त्यांचा हिस्सा 17.66% आहे. सरकारी कंपन्या बीएसएनएल आणि एमटीएनएल मिळून 7.84% बाजारपेठेवर ताबा ठेवून आहेत.
फिक्स्ड ब्रॉडबँड सेगमेंटमध्ये देखील जिओचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येते. एप्रिल 2025 मध्ये जिओकडे एकूण 9.10 लाख नवीन ब्रॉडबँड ग्राहकांची नोंद झाली असून, यात वायरलाइन तसेच फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) ग्राहकांचा समावेश आहे. हे प्रमाण एअरटेलने जोडलेल्या 2.30 लाख नवीन ग्राहकांच्या तुलनेत जवळपास चारपट अधिक आहे.