सिन्नर- नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र, तालुका संचालक दिनकर उगले यांची तर व्हॉईस चेअरमनपदी सुरेश भोये (पेठ) यांची आज २२ जुलै रोजी बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते चेअरमन शिवाजी रौंदळ, व्हॉईस चेअरमन योगेश गोलाईत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागांसाठी जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्या आदेशाने संचालक मंडळाची विशेष बैठक आज संघाच्या नाशिक येथील कार्यालयात पार पडली. त्यात ही निवड करण्यात आली. सूरगाण्याचे सहाय्यक निबंधक माधवशिंदे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. निर्धारित वेळेत दोन्ही जागांसाठी उगले व भोये यांचाच प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा शिंदे यांनी केली. निवडीची घोषणा होताच उगले व भोये समर्थकांनी गुलाल उधळत व घोषणाबाजी करीत आपला आनंद व्यक्त केला. रौंदळ व गोलाईत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संपत सकाळे व राजेंद्र भोसले यांची शुभेच्छापर भाषणे झाली. सर्व संचालकांनी बिनविरोध निवड केल्याने आमची जबाबदारी वाढली असून आगामी वर्षात जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थाच्या हितसंवर्धनासाठी कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही उगले यांनी दिली. मजूर संघांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी संघाचे संचालक संभाजी पवार, विठ्ठलराव वाजे, चिंतामण गावीत, शिवाजी कासव, हरिभाऊ वाघ, शशिकांत आव्हाड, प्रमोद भाबड, योगेश हिरे, जगन्नाथ वाजे, प्रमोद मुळाणे, सतीश सोमवंशी, शशिकांत उबाळे, निलेश आहेर, प्रतिभा शिरसाठ, आशा चव्हाण, किरण टिळे, संजय चव्हाण, रमेश शिरसाठ उपस्थित होते.