जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव जिल्हा दूध संघाच्या अत्यंत चुरशीची निवडणुकीत सासऱ्या विरोधात सून मैदानात उतरल्याचे चित्र दिसले. एकनाथ खडसे यांच्या सात वर्षाच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी त्यांचे विरोधक एकवटले असून त्यांना खडसे यांच्या सून भाजपच्या खा. रक्षा खडसे यांनी साथ दिली आहे. या निवडणुकीत एकनाथ खडसे विरुध्द गिरीश महाजन असा सामना रंगला आहे.
मुक्ताईनगर येथे रविवारी झालेल्या या निवडणुकीसाठी शेतकरी विकास पॅनलच्या मतदारांचा मेळावा घेण्यात आला. या शेवटच्या मेळाव्यात मंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, मुक्ताईनगरचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील, मंगेश चव्हाण आणि दूध संघाचे मतदार उपस्थित होते. यावेळी रक्षा खडसे यांनी जोरदार भाषण केले. याच व्यासपीठावर असलेल्या चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी याच व्यासपीठावरून एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली. पण, दुसरीकडे रक्षा खडसे यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी त्यांनी रक्षाताई इथे असल्याने मला जास्त बोलता येत नाही असे सांगत टीकेला आवरही घातला.