जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीव्हीवर पूर्वी संतूर साबणाची एक जाहिरात यायची. त्यात एका लेकीची आई ‘मेरी त्वचा से मेरी खुबसुरती का पताही नहीं चलता’ असं म्हणायची. जळगावात अलीकडेच या डायलॉगची आठवण करून देणारी घटना घडली. घटनाक्रम ऐकल्यानंतर तुम्ही सुद्धा ‘आपके चेहरे से बदमाशी का पता ही नहीं चलता’ असेच म्हणाल, हे नक्की.
जळगाव येथून ३३ लाख रुपये किमतीचे संतुर साबण घेऊन निघालेला एक अख्खा ट्रकच गायब झाल्याची घटना पुढे आली आहे. माल घेऊन ट्रक गायब झाल्याच्या घटना काही नव्या नाहीत. पण या ट्रकमध्ये संतुर साबण असल्यामुळे त्याची चर्चा जास्त होत आहे. जळगाव येथील विप्रो कंपनीतून हा ट्रक निघाला. त्याला कर्नाटक राज्यातील तुमकुर येथे पोहोचायचे होते. मामा ट्रान्सपोर्ट कंपनीकडून ट्रक भाड्याने घेण्यात आला.
विप्रो कंपनीतून ट्रक निघताना मालक आणि चालक दोघांनाही ५० हजार रुपये रोख देण्यात आले. तसेच जवळपास ६५ हजार एवढे भाडे ठरविण्यात आले. ट्रक कंपनीतून कर्नाटकच्या दिशेने रवाना झाला. या ट्रकमध्ये एकूण ९८० बॉक्स होते. यात १० टन शंभर किलो वजन आणि ३३ लाख रुपयांच्या संतुर साबणाचा माल होता. लाखो रुपयांचा साबणाचा माल घेऊन निघालेला ट्रक ठरलेल्या दिवशी पोहोचला नाही, त्यामुळे पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलिसांनी चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कंपनीला बनविले ‘मामा’
मामा ट्रान्सपोर्टच्या ट्रकने संतुर साबणाच्या कंपनीलाच मामा बनविले. ४ जानेवारीला निघालेला ट्रक ९ जानेवारीला कर्नाटकात पोहोचणे आवश्यक होते. पण ट्रक पोहोचला नाही म्हणून ट्रक चालकाला फोन करण्यात आला. पण चालक आणि मालक दोघांचेही फोन बंद येत आहेत. आता पोलीस संतुर साबणाच्या शोधात गावोगाव फिरत आहेत.
Jalgaon Crime Santoor Soap Truck Theft Police
Amalner