मुंबई – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे, कारण तिच्यावर ईडीने संशय व्यक्त केला आहे. त्यामुळेच तिला शोसाठी परदेशात जात असताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले आहे. कुप्रसिद्ध भामटा सुकेशच्या २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील खुलासा पत्रकामुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जॅकलीनला मुंबई विमानतळावर थांबवले. त्यामुळेच आता तिची कुठल्याही क्षणी ईडीकडून चौकशी होऊ शकते.
सुकेश चंद्रशेखरसोबतच्या संबंधांमुळे जॅकलीन काही दिवसांपासून चर्चेत आहे. अलीकडेच ईडीच्या अहवालात सुकेशने जॅकलिनला करोडोंच्या भेटवस्तू दिल्याचे म्हटले आहे. तिहार तुरुंगात बसून २०० कोटींची वसुली करणारा मोठा भामटा सुकेश चंद्रशेखर यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात चंद्रशेखर बाबत अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला ५२ लाखांचा घोडा आणि ९ लाख किमतीची एक पर्शियन मांजर भेट दिली होती. इतकेच नाही तर नोरा फतेही याला दिलेल्या करोडो रुपयांच्या भेटवस्तूंचाही या आरोपपत्रात उल्लेख आहे.
मुंबई विमानतळावर आलेली जॅकलिन फर्नांडिस एका शोसाठी दुबईला रवाना होणार होती. अशा ईडीच्या संशयामुळे जॅकलिनला विमानतळावर थांबवण्यात आले आणि तिला परदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. लुक आऊट सर्क्युलरच्या सूचनेनुसार जॅकलिन देश सोडू शकत नाही, असे सांगण्यात येत आहे. जॅकलिनला आता दिल्लीत आणून ईडी तिची चौकशी करणार आहे.
दरम्यान, सुकेश तुरुंगात असताना तो जॅकलिनशी फोनवर बोलत असे. यापुर्वी सुकेश जेव्हा जामिनावर तुरुंगातून बाहेर आला तेव्हा त्याने चेन्नईला जाण्यासाठी चार्टर्ड फ्लाइट बुक केली. तसेच त्याने जॅकलिनसाठी मुंबई ते दिल्लीचे फ्लाइट बुक केले. यानंतर दोघेही चेन्नईतील एका हॉटेलमध्ये थांबले. सुकेशने प्रायव्हेट जेटवर ८ कोटी रुपये खर्च केले. सुकेशने जॅकलिनच्या भावालाही पैसे पाठवले. या प्रकरणी ईडीने चौकशी केली आहे.