मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियान्सकडून खेळणाऱ्या आणि आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या कुमार कार्तिकेयची अतिशय थ्रिलींग जीवनकहाणी आहे. तीच आज आपण जाणून घेणार आहोत. क्रिकेटमध्ये करिअर करण्यासाठी त्याने घर सोडले, वर्षभर एकवेळच जेवण केले. ठिकठिकाणी मोलमजुरी केली आणि आज तो यशस्वी खेळाडू बनला आहे.
सुमारे नऊ वर्षांपूर्वी कार्तिकेय हा 15 वर्षांचा होता. क्रिकेटमध्ये करिअर करायचे म्हणून त्याने घर सोडले. म्हणूनच कानपूर सोडून तो दिल्लीला पोहोचला. क्रिकेटमुळे कुटुंबावर कधीही आर्थिक बोजा पडणार नाही, असे वचन त्याने कुटुंबाला दिले. कार्तिकेयला त्याचा दिल्लीतील मित्र राधेश्याम सोडून कोणीही ओळखत नव्हते. राधेश्याम लीग क्रिकेटमध्ये खेळायचा. त्याने कार्तिकेयाला मदत केली. दोघेही अनेक क्रिकेट अकादमीत गेले, पण सगळेच जास्त पैसे मागत होते. तरीही कार्तिकेय डगमगला नाही.
अखेर दोघेही क्रिकेट प्रशिक्षक संजय भारद्वाज यांच्याकडे गेले. तिथे राधेश्यामने सांगितले की, कार्तिकेयकडे पैसे नाहीत. असे असतानाही भारद्वाजने दोघांना मदत केली. त्याने कार्तिकेयला ट्रायल देण्यास सांगितले. नेटमध्ये चेंडू पाहिल्यानंतर भारद्वाजने त्याची निवड केली. कार्तिकेयाला कोचिंग मिळाले, पण राहणे आणि जेवणाची भ्रांत होती. अखेर तो गाझियाबादजवळील मसुरी गावात मजूर म्हणून काम करू लागला. अकादमीपासून ते 80 किलोमीटर दूर होते. त्यांना कारखान्याजवळ राहण्यासाठी जागा मिळाली. रात्री कारखान्यात काम करायचे आणि दिवसा अकादमीत जायचे. बिस्किटांसाठी 10 रुपये वाचावेत म्हणून अनेक किलोमीटर ते चालत जायचे.
हे दोघे अनेक किलोमीटर पायी येतात हे कळल्यावर प्रशिक्षक भारद्वाज यांनीच अकादमीत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. अकादमीतील आचाऱ्यासोबत ते राहू लागले. ज्यावेळी आचारीने कार्तिकेयला दुपारचे जेवण दिले तेव्हा तो अक्षरशः ओक्साबोक्शी रडू लागला. कारण, गेल्या वर्षभरापासून तो केवळ रात्रीचेच जेवण करीत होता. दुपारचे जेवण त्याला माहितच नव्हते.
भारद्वाज यांनी त्याला दिल्लीच्या एका शाळेत प्रवेश घेऊन दिला. त्यानंतर तो शाळेच्यावतीने खेळू लागला. पुढे त्याने अनेक यश मिळविले. दिल्ली क्रिकेट संघात त्याची निवड होऊ शकली नाही. मध्य प्रदेश संघाकडून त्याला संधी मिळाली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि आज तो आयपीएल गाजवत आहे.