मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या आल्या आहेत. तब्बल ८ वेळा त्यांना कॉल केल्याची माहिती आहे. अवघ्या तीन तासात तुम्हाला संपवू अशी धमकी कॉलरने दिली आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य पाहता पोलीसही सतर्क झाले आहेत. यापूर्वीही मनसुख हिरेन प्रकरणात अशीच घटना समोर आली होती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना अज्ञात कॉलरकडून धमकी देण्यात आली आहे. रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये कॉल आल्याचे वृत्त आहे. एका दिवसात ८ वेळा कॉल करण्यात आल्याची माहिती आहे. वृत्तानुसार, कॉलरने अंबानी कुटुंबाला तीन तासांत काहीतरी मोठे घडणार असल्याचे सांगितले आहे. रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांना माहिती दिली आहे.
याठिकाणी तक्रार मिळताच पोलीसही सतर्क झाले आहेत. सध्या त्यांचे जबाब नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे. तसेच फोन करणाऱ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये सूत्रांच्या हवाल्याने असे सांगण्यात येत आहे की, हॉस्पिटलची सुरक्षा देखील वाढवली जाऊ शकते. मात्र, अंबानी यांना आधीच सरकारकडून कडेकोट सुरक्षा आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांनी रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलने अंबानी कुटुंबाला दिलेल्या धमक्यांबाबत तक्रार दाखल केली आहे. हॉस्पिटलमध्ये तीनहून अधिक कॉल आल्याची माहिती त्यांनी दिली.
Industrialist Mukesh Ambani Family Threat