मुंबई – भारतात हा क्रिकेटवेड्यांचा देश आहे, असे म्हणतात. त्यामुळे क्रिकेटचे सामने कधी होणार? याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. मग आयपीएल असो टी-20 सामने. त्याच्या तारखा जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तारखा जाहीर झाल्या आहेत.
जगातील या सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु बीसीसीआयने मुख्य सहभागधारकांना अंतर्गत माहिती दिली आहे की, 2 एप्रिल 2022 ही स्पर्धा सुरू होण्याची संभाव्य तारीख आहे. यावेळी 10 संघ खेळणार असून एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. यावेळी, सर्व संघ 14-14 सामने खेळतील, ज्यामध्ये सात सामने त्यांच्या होमपीचवर( घरच्या मैदानावर ) आणि सात सामने विरोधी संघाच्या होमपीचवर खेळले जाणार आहेत.
आपल्या सर्वांना माहित आहे की, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून आयपीएल 2021 चे विजेतेपद जिंकले, त्यामुळे गतविजेते असल्याने, CSK पहिल्या सामन्यात पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सचा सामना करेल. बीसीसीआयमध्ये हेही मान्य करण्यात आले आहे की पुढील हंगाम 60 दिवसांपेक्षा जास्त काळ चालणार आहे. दि. 4 किंवा 5 जून ही संभाव्य तारीख असल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात अंतिम सामना होणार असल्याची चर्चा आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच आयपीएल 2022 भारतात होणार असल्याची माहिती दिली. आता यात दोन नवीन संघांची भर पडल्याने आयपीएलची उत्कंठा आणखी वाढेल, अशी माहीती त्यांनी चेन्नई सुपर किंग्जने, चेन्नई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली. गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचे आयोजन भारताऐवजी यूएईमध्ये केले जात आहे. कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी संपूर्ण स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती, तर यावर्षी आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळला गेला. दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यानंतर आयपीएलची धामधूम सुरू होण्याची चिन्हे आहेत.