मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील ४६ महसूल मंडळे आज दुष्काळसदृष्य म्हणून घोषित करण्यात आली आज मंत्रालयामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये आपतग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे उपस्थित होते. नाशिक जिल्हयातील या सर्व मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी मंत्री भुजबळ हे आग्रही होते.
दुष्काळ व्यवस्थापन संहीतेनुसार ज्या तालुक्यांमध्ये मध्यम अथवा गंभीर दुष्काळी परिस्थितीची शक्यता संभवते अशा ४० तालुक्यांमध्ये यापूर्वीच Trigger-2 लागु झाला आहे. त्यानुसार यापूर्वीच ४० तालुक्यांतील २६९ महसुली मंडळात दुष्काळ लागु झाला आहे.त्यात नाशिक जिल्हयातील येवला, सिन्नर व मालेगावचा समावेश झालेला होता.
नाशिक जिल्हयात या वर्षी अतिशय कमी पर्जन्यमान झालेले आहे. अनेक गावांमध्ये उशिरा पाउस पडल्याने पेरणी उशिरा झालेली आहे. पेरणी नंतर चार ते पाच आठवडे पावसाचा खंड पडल्याने असंख्य शेतकऱ्यांना दुबार पेरण्या कराव्या लागलेल्या आहेत. तसेच सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात देखील पाउस न आल्याने कापूस,मका,कांदा,भूईमुग,ज्वारी इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. जमिनीतील पाणी पातळीत घट झालेली आहे. खरीप हंगामातील संपूर्ण पिके वाया गेलेली आहेत.जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न् गंभीर बनलेला आहे.पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई निर्माण झालेली आहे. अनेक गांवांना टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बळीराजा शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्याचा विचार करता लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केलेली होती.
आज झालेल्या बैठकीमध्ये नाशिक मधल्या निफाड तालुक्यातील लासलगाव ,देवगाव, नांदूर मधमेश्वर,निफाड,चांदोरी, रानवड, पिंपळगाव बसवंत, सायखेडा, ओझर, नांदगाव तालुक्यातील नांदगाव, मनमाड, वेहेलगाव, जातेगाव, हिसवल बुद्रुक ,नाशिक तालुक्यातील नाशिक, देवळाली, पाथर्डी, माडसांगवी, मखमलाबाद, शिंदे, सातपूर, गिरणारे,कळवण तालक्यातील कळवण, नविबेज, मोकभनगी, कनाशी बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर, ताहाराबाद, जाय खेडा, वीरगाव, मुल्हेर,चांदवड तालुक्यातील चांदवड, रायपूर, दुगाव, वडनेर भैरव, वडळी भोई, दिघवद, देवळा तालुक्यातील देवळा, लोहोनेर, उमराणे या ४६ महसूल मंडळांचा दुष्काळसदृश म्हणून सामावेश करण्यात आला आहे. या महसुली मंडळातील गावांना दुष्काळी भागातील गावांसाठी देय असलेल्या सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्या असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, नवीन निर्माण झालेल्या काही महसूल मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र नाही त्या मंडळांमध्ये जिल्हाधिकारी यांच्याकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवून या समितीची पुन्हा बैठक घेऊन उरलेल्या महसूल मंडळांचा देखील सामावेश आम्ही लवकरात लवकर या यादीमध्ये करु.
या बैठकीला अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह उपसमितीचे अध्यक्ष आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,कृषीमंत्री धनंजय मुंढे,रोहयो मंत्री संदीपान भूमरे याबरोबरच संबंधित विभागाचे अपर मुख्य सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.