ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर करण्यात येणाऱ्या उपायोजनांविषयीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः शुक्रवारी (दि.9 ऑगस्ट रोजी) संबंधित सर्व यंत्रणांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेवून संपूर्ण रस्त्याची पाहणी केली. यावेळी हायवे दिवे ग्रामपंचायतीच्या हद्दीत महामार्गालगत डेब्रिजचा मोठा ढिगारा रस्त्याच्या कडेला टाकलेला आढळून आला. डेब्रिजच्या या ढिगार्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष जाताच मुख्यमंत्री चांगलेच संतापले. त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना याबाबत विचारणा करीत सर्वप्रथम डेब्रिज तात्काळ हटविण्यासाठी संबंधिताना तात्काळ सांगावे आणि तद्नंतर डेब्रिज टाकणाऱ्यावर व संबंधित यंत्रणेवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या सूचनेनंतर तहसिलदार अभिजित खोले यांनी तात्काळ या आदेशाची अंमलबजावणी करीत या परिसरातील नियोजन प्राधिकरण असलेल्या एमएमआरडीए व पंचायत समिती प्रशासनाकडून तातडीने स्पष्टीकरण मागविले असून हे डेब्रिज नेमके कोणी टाकले आहे व संबंधित यंत्रणा कोण आहे याविषयी चौकशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्याबरोबर संबंधितांवर अत्यंत कठोर कारवाई होणार, हे मात्र निश्चित.