इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी कमी होत नाहीत. दिल्ली दारू घोटाळ्याशी संबंधित ‘सीबीआय’ प्रकरणात राऊस एव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली आहे. आता ८ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.
तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केजरीवाल यांची हजेरी झाली. ‘सीबीआय’ने केजरीवाल यांना तिहार तुरुंगातूनच अटक केली होती.
याआधी १२ जुलै रोजी ‘सीबीआय’मार्फत तपास करत असलेल्या अबकारी धोरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत शुक्रवारी २५ जुलैपर्यंत वाढ केली होती. केजरीवाल यांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्यासमोर हजर करण्यात आले.
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यानंतर ते केंद्रीय अन्वेषण विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) प्रकरणांमध्ये हजर झाले. दुसरीकडे, दिल्ली उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्पादन शुल्क धोरण प्रकरणाशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील निकाल राखून ठेवला. केजरीवाल यांनी त्यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. संपूर्ण पुरावे उपलब्ध झाल्यानंतरच कायद्यानुसार अटक करण्यात आल्याचे ‘सीबीआय’ने म्हटले आहे. न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनीही केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे.