नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण संस्थेत सरळ सेवेने रिक्त जागा न भरता मर्जीतील कर्मचा-यास थेट पदोन्नती देण्यात आल्याने भद्रकाली पोलिस ठाण्यात शासनाची दिशाभूल करून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील विद्या सागर शिक्षण प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेत हा गैरप्रकार घडला आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या उपशिक्षणाधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे. मुख्याध्यापक व तत्कालिन संचालक मंडळाने हा गैरप्रकार केल्याचा आरोप उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी दिलेल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, विद्या सागर शिक्षण संस्थेत बी.ए. बीएड वेतन श्रेणीचे शिक्षक पद रिक्त असतांना संशयितांनी १४ जून २०१० ते १५ जून २०१९ दरम्यान मर्जीतील उपशिक्षक (डीएड) पदी नेमणुकीस असलेल्या कर्मचा-यास थेट बीए बीएड या पदावर पदोन्नती दिली.
त्याचप्रमाणे पद उपलब्ध नसतांना सदर पदावर अतिरिक्त अन्य एका शिक्षकाची नियुक्ती करून बेकायदेशीर कृत्य करून शासनाची फसवणुक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक सोनवणे करीत आहेत.