इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (एफटीए) तसेच दुहेरी योगदान करार वाटाघाटीच्या यशस्वी समापनाबद्दल समाधान व्यक्त केले आणि हा महत्त्वाचा टप्पा गाठण्यासाठी दोन्ही बाजूंनी केलेल्या भरीव सहयोगाची प्रशंसा केली.
दोन्ही देशांदरम्यान असलेल्या द्विपक्षीय बंधांतील वाढत्या गतिमानतेचे स्वागत करून पंतप्रधान मोदी यांनी भारत-ब्रिटन धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तंत्रज्ञान संरक्षण उपक्रमाअंतर्गत सुरु असलेल्या सहकार्याचे त्यांनी स्वागत केले आणि त्यातील विश्वासू तसेच सुरक्षित नवोन्मेष परिसंस्थांना आकार देण्याची क्षमता लक्षात घेतली.
परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, तंत्रज्ञान, नवोन्मेष तसेच स्वच्छ उर्जा यांसह महत्त्वाच्या इतर अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी वाढवण्यात ब्रिटनला असलेले स्वारस्य व्यक्त केले. एफटीएमुळे दोन्ही देशांसाठी नव्या आर्थिक संधी खुल्या होतील असा विश्वास डेव्हिड लॅमी यांनी व्यक्त केला.
दोन्ही नेत्यांनी क्षेत्रीय तसेच जागतिक मुद्द्यांबाबत विचारविनिमय केला. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आणि सीमापार दहशतवादाविरोधात सुरु असलेल्या भारताच्या लढ्याला पाठींबा व्यक्त केला. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दहशतवादाविरुद्ध आणि त्याला मदत करणाऱ्यांविरुद्ध निर्णायक आंतरराष्ट्रीय कृतीची गरज अधोरेखित केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याप्रती हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आणि त्यांना पुन्हा एकदा परस्परांच्या सोयीनुसार लवकरात लवकर भारतभेटीचे आमंत्रण दिले.