मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्कम टॅक्स भरण्यासाठी मुदतीच्या शेवटच्या दिवसाची वाट बघणं महागात पडू शकतं. सर्वच करदाते जसजशी मुदत जवळ येते तसतसे इन्कम टॅक्स भरत असल्याने सिस्टीमवर भार निर्माण होण्याची शक्यता वाढते. परिणामी तांत्रिक समस्या निर्माण रिटर्न्स भरण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुमचा समावेश इन्कन टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांच्या यादीत होत असेल किंवा तुम्हाला इन्कम टॅक्स भरायचा असेल तर आयटीआर भरण्यासाठी शेवटच्या दिवसाची वाट पाहू नका. आजच आपला आयटीआर दाखल करणे योग्य ठरणार आहे.
आयटीआर भरण्यासाठी शेवटचे काही दिवस उरल्यानंतर करदाते आयटीआर भरण्याची घाई करतात. यात काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास तुमच्या आयटीआरला विलंब होऊ शकतो. आर्थिक वर्ष २०२१ – २२ किंवा मुल्यांकन वर्ष २०२२ – २३ साठी आयटीआर भरण्यासाठीची शेवटची तारीखी ही ३१ जुलै आहे. त्यामुळे आता आयटीआर भरण्यासाठी अवघे १५ दिवस उरले आहेत. ऐनवेळी घाई करण्यापेक्षा आजच आपला आयटीआर दाखल करून निश्चित होणे आपल्या फायद्याचे ठरणार आहे.
मुदतवाढीची शक्यता नाही
आर्थिक वर्ष २०२१ – २२ किंवा मुल्यांकन वर्ष २०२२ – २३ साठी आयटीआर भरण्याची शेवटची तारीख ही ३१ जुलै आहे असे आयकर विभागाने जाहीर केले आहे. करदाते ३१ जुलैपर्यंत आयटीआर दाखल करू शकतील. परंतु, या तारखेनंतर आयटीआर दाखल केला तर दंड भरावा लागू शकतो. गेले दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे आयटीआर भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. यंदाही मुदतवाढ मिळण्याची शक्यता गृहित धरणार असाल तर तसे होणार नाही. केंद्र सरकारने तसे स्पष्ट केले आहे.
त्यावरही भरावा लागणार कर
महागाईने नागरिकांना हैराण केले आहे. केवळ नोकरीतून मिळणाऱ्या पैशांमधून घर चालवणे अनेकांसाठी आव्हान बनले आहे. त्यामुळे अनेक नोकरदार वर्ग नोकरीसोबतच इतर उत्पन्नांकडे वळले आहेत. घर भाड्यातून मिळणारे उत्पन्न, शेअर बाजारात गुंतवणूक केली असल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न, म्युच्युअल फंडमधून मिळणारा परतावा आणि अन्य प्रकारांच्या उत्पन्नांचा त्यात समावेश आहे. या सर्वांवर आयकर विभागाकडून नियमानुसार कर आकारण्यात येतो. या उत्पन्नाची माहिती लपवल्यास व आयकर विभागाच्या ते निर्दशनास आल्यास चौकशीचा सामना करावा लागू शकतो.
Income Tax Return Deadline Fine Penalty ITR