मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पॉलिटिकल फंडिंग प्रकरणी आयकर विभागाने मुंबईत छापेमारी सुरू केली असून, आयकर विभागाने सायनच्या एका झोपडपट्टीतही छापेमारी केली आहे. झोपडपट्टीत छापा मारण्याची ही पहिलीच वेळ असल्याने या छापेमारीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
मुंबईच्या सायन आणि बोरिवलीत आयकर विभागाने झाडाझडती सुरू केली आहे. आयकर विभाग थेट झोपडपट्टीत घुसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून झोपडपट्टीवासियांमध्ये खळबळ उडाली आहे. मुंबईशिवाय औरंगाबादमध्येही दोन दिवसांपासून छापेमारी सुरू आहे. मिड डे मिल डिलिव्हरी करणाऱ्या सतीश व्यास नावाच्या व्यापाऱ्याच्या घर, कार्यालय आणि हॉटेलात छापेमारी करण्यात आली आहे.
चार ठिकाणी एकूण ५६ अधिकारी छापेमारी करत आल्याने औरंगाबादमध्येही खळबळ उडाली आहे. याबरोबरच, राजस्थानातील शाळांमध्ये मिड डे मिलशी संबंधित स्कॅमची लिंक आता औरंगाबादशी लावली जात आहे. गेल्या बुधवारपर्यंत आयकर विभागाने देशभरात ११० ठिकाणी छापेमारी केली आहे. औरंगाबादचे व्यापारी सतीश व्यास यांना राजस्थानच्या शाळांमध्ये मिड डे मीलचा पुरवठा करण्याचं कंत्राट मिळाले असून, राजस्थानातील अन्नधान्य घोटाळ्याशी याचा संबंध लावला जात आहे.
टॅक्स वाचवण्यासाठी पॉलिटिकल फंडिंगच्या नावाखाली पैशांची हेराफेरी सुरू असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानंतर आयकर विभागाने ही छापेमारी सुरू केली. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतही वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. सायनमधील एका झोपडपट्टीत आयकर विभागाने छापेमारी केल्याने सर्वचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या झोपडपट्टीत एका नोंजणीकृत राजकीय पक्षाचे ऑफिसदेखील आहे.
केवळ १०० स्क्वेअर फुटाच्या म्हणजे दहा बाय दहाच्या झोपडीत एका राजकीय पक्षाचे हे कार्यालय असून बँक रेकॉर्डनुसार या कार्यालयाला गेल्या दोन वर्षात १०० कोटींचा निधी मिळाला आहे. या राजकीय पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर फसवणूक सुरु असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आयकर विभागाने या राजकीय पक्षाच्या अध्यक्षाची चौकशी केली असता त्याने मी केवळ नावाला अध्यक्ष आहे, स्टेट्स सिंबॉलसाठी हे पद माझ्याकडे मी ठेवले असल्याचे त्याने सांगितले. तसेच पार्टीचं फंडिंग आणि बाकीची कामे अहमदाबादच्या ऑडिटरद्वारे केले जात असल्याची माहितीही त्याने आयकर विभागाला दिली आहे.
Income Tax Raid in Slum Area Borivali Sion